गगनीचा अढळ तारा — कलेतून सेवाभावाचा अविस्मरणीय प्रवास
दिनांक १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे रसिक कलारंजन, पुणे निर्मित आणि श्री. सुधीर भगत आयोजित ‘गगनीचा अढळ तारा’ हा कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या साहित्यविश्वावर आधारित अप्रतिम कार्यक्रम अनुभवण्याचा योग आला.
कुसुमाग्रज हे मराठी साहित्यविश्वातील खऱ्या अर्थाने ‘गगनीचा अढळ तारा’ आहेत. त्यांच्या जीवनातील प्रसंग, साहित्यिक प्रवास आणि अजरामर कविता, गीते, गायन, वादन व नृत्याच्या माध्यमातून ज्या कलात्मकतेने रसिकांसमोर साकारले गेले, ते मनाला स्पर्शून गेले. ‘गर्जा जयजयकार’, ‘वीर दौडले सात’, ‘कणा’ यांसारख्या रचनांनी सभागृह अक्षरशः भारावून गेले.
या कार्यक्रमाचे खरे वैशिष्ट्य मात्र कलेला लाभलेली सेवाभावाची सुंदर किनार होती. श्री. सुधीर भगत यांनी या प्रयोगाच्या तिकीट विक्रीतून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम अनामप्रेम संस्थेच्या कार्यासाठी अर्पण केली, ही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आणि भावस्पर्शी बाब आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःच्या वतीने ₹२१,०००/- ची आर्थिक मदत देऊन आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती दिली.
ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नाही; त्यामागे दिव्यांगांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याची, त्यांच्या स्वावलंबनाला बळ देण्याची आणि समाजाने समाजासाठी उभे राहण्याची भावना आहे. म्हणूनच श्री. भगत यांचे हे योगदान अनामप्रेम परिवारासाठी कायम स्मरणात राहील.
कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे पदाधिकारी डॉ. सायली सोमण व इंजि. अजित माने यांनी अनामप्रेम संस्थेचे कार्य उपस्थित रसिकांसमोर प्रभावीपणे मांडले. त्यामुळे आर्थिक सहकार्याबरोबरच अनामप्रेमच्या कार्याची ओळख अनेक संवेदनशील मनांपर्यंत पोहोचविण्याची अमूल्य संधी आम्हाला मिळाली. हीच या उपक्रमाची आणखी एक मोठी जमेची बाजू आहे.
कलेतून आनंद, आनंदातून संवेदना आणि संवेदनांतून समाजसेवा—या सुंदर त्रिवेणीचा अनुभव ‘गगनीचा अढळ तारा’ या कार्यक्रमातून मिळाला.
श्री. सुधीर भगत, महंत फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडची संपूर्ण टीम, दिग्दर्शक श्री प्रसाद कुलकर्णी, लेखिका अंजली दफ्तरदार आणि ‘गगनीचा अढळ तारा’ सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच या उपक्रमामागे भक्कमपणे उभे राहिलेले डॉ. प्रकाश शेठ यांचे विशेष आभार.
श्री. सुधीर भगत यांचा “समाज आहे, म्हणून आम्ही आहोत” हा विचार केवळ शब्दांत न राहता कृतीतूनही दिसून येतो, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
श्री. सुधीर भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमला अनामप्रेम व स्नेहालय परिवारातर्फे मनःपूर्वक धन्यवाद, कृतज्ञतापूर्वक सलाम आणि हार्दिक शुभेच्छा!





Comments